प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाचा तरुणीच्या कुटुंबीयांकडून कुऱ्हाडी वार करत निर्घृण खून

बुलडाणा- जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सावळा येथे तरुणावर कुऱ्हाडीचे वार करुन निर्घृण हत्या झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. तरुणी प्रेयसीच्या घरात रेड तिच्यासोबत आढळल्याने तरुणीच्या घरच्यांनी तरुणावर लाकडी दांडे आणि कुऱ्हाडीचे वार केल, त्यानंतर उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी तरुणीच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संग्रामपूर तालुक्यातील सावळा येथील ज्ञानेश्वर देवेंद्र घिवे (वय-35,रा.सावळा) याचे शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. घटनेच्या रात्री ज्ञानेश्वर हा प्रेयसीच्या घरात सापडल्याने प्रेयसीच्या नातेवाईकांनी ज्ञानेश्वरला बेदम मारहाण केली. ज्ञानेश्वरवर कुऱ्हाडीने वार करण्यात आले, गुरुवारी सकाळी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


याप्रकरणी देवेंद्र घिवे (रा.सावळा) यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रभाकर महादेव धुळ, गजानन महादेव धुळ,अजाबराव महादेव धूळ, गणेश प्रभाकर धुळ, प्रकाश गजानन धुळ, रामराव अजाबराव धुळ, विठ्ठल अजाबराव धुळ, ज्ञानेश्वर मनोहर धुळ (सर्व रा. सावळा, ता. संग्रामपूर) यांच्याविरोधात तामगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्यानुसार आठ जणांविरुद्ध भादंवि कलम 302, 143, 147, 148, 149 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गणेश प्रभाकर धूळ आणि ज्ञानेश्वर प्रभाकर धूळ या दोन आरोपींना अटक केली असून सहा आरोपी अद्याप फरार आहेत.