निर्दयी आईने आधी पाण्यात बुडवून पोटच्या मुलीची केली हत्या नंतर आत्महत्या करुन संपवले आयुष्य

अकोला- आईने आपल्या दीड वर्षीय मुलीला पाण्याच्या टाक्यात बुडवून मारले नंतर स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची ह्दयद्रावक घटना डाबकी रोड येथील गजानन नगरातील गल्ली नंबर 2 मध्ये बुधवारी दुपारी घडली. रुपाली गिरधर इंगोले (वय 26) असे महिलेचे नाव आहे तर आनंदी असे दीड वर्षीय निरपराध मुलीचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी रुपाली यांची सासू बाहेर गेल्या होत्या तर सहा वर्षाची दुसरी मुलगी घराबाहेर खेळत होती. यावेळी घरात आनंदी आणि तिची आई रुपाली दोघीच होत्या. घरातून किंकाळण्याचा आवाज आल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेत घराचा दरवाजा तोडला. त्यानंतर घरातील पाण्याच्या टाकीत आनंदी बुडालेली दिसून आली तर आई जळालेल्या अवस्थेत होती. मुलीला मारल्यानंतर आईने गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र दोरी तुटल्याने तिने जाळून घेवून आत्महत्या केली. रुपाली यांचा पती गिरीधर पंधरा दिवसांपासून शेतीमजुरीसाठी बाहेरगावी गेले आहेत. रुपालीने आपल्या पोटच्या मुलीची आनंदीची हत्या का केली आणि स्वत:ही आत्महत्या केली याच कारण अद्याप अस्पष्ट आहे.