अकोल्यात आढळले नवे सात रुग्ण, जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 9 वर

अकोला. वाशिम जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अकोला जिल्ह्यातील पातूर येथील सात जणांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यासातही जणांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाप्रशासनाने दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 9 वर पोचला आहे.


गेल्या महिनाभरापासून जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. गेल्या दोन दिवसात सलग अकोला शहरातील बैदपुरा आणि अकोट फैल या भागात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने या परिसराला सिल करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाने सुरु केली अशातच गुरुवारी, 9 एप्रिलला जिल्ह्यातील पातूर येथील 7 जणांचे वैद्यकिय अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आणि पातूर व खेट्री येथील 13 जण हे अमरावतीला एकमेकांच्या संपर्कात आले होते. ही बाब समोर येथाच त्यांना तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करुन नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सात जणांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे.