मुंबई. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. गुरुवारी एका दिवसात राज्यात तब्बल ८८ नवे पॉझिटिव्ह अहवाल आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४२३ वर गेली आहे. गुरुवारी मुंबईत दोन, तर पुणे व जळगावात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यातील आतापर्यंत २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ४२ जण बरे होऊ घरी परतले आहेत. गुरुवारी मुंबई व परिसरात सर्वाधिक म्हणजे ६३ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी मुंबईत ५४, पुण्यात ११, अहमदनगरमध्ये ९, औरंगाबाद २, तर सातारा, उस्मानाबाद, बुलडाणा आणि हिंगोलीतही प्रत्येकी एक नवीन रुग्ण आढळला आहे.
> रायगड - रत्नागिरी शहरानजीक आज एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. ही व्यक्ती दिल्ली येथून आल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली. त्यामुळे आता आरोग्य विभाग चांगलेच अलर्ट झाले आहे. हा कोरोना बाधित रुग्ण दिल्लीच्या निजामुद्दीन मरकज येथील धार्मिक कार्यक्रमास गेला होता.
> फक्त 12 तास उघडी राहणार मेडिकल आणि किराणा दुकान
लॉकडाउन दरम्यान किराणा दुकान आणि मेडिकलवर गर्दी वाढत होती. यावेळी सोशल डिस्टेंसिंगचे पालन केले जात नव्हते. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका होता. यामुळे आजपासून (शुक्रवार 3 एप्रिल) मेडिकल आणि किराणा दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सुरू राहणार आहेत. दरम्यान आवश्यकता भासल्यास ही दुकाने 24 तासांसाठी खुली केली जातील असे सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे. याप्रकरणी आदेशाचे उल्लंघन झाल्यास अन्न पुरवठा विभाग, एफडीए आणि पोलिस विभाग यांना कारवाईचा अधिकार असेल.
राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या
मुंबई २३५, पुणे (शहर व ग्रामीण) ६१, सांगली २५, ठाणे मंडळातील मनपा ४५, नागपूर १६, यवतमाळ ४, अहमदनगर १७, बुलडाणा ५, सातारा, औरंगाबाद प्रत्येकी ३, कोल्हापूर २, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक, उस्मानाबाद, हिंगोली प्रत्येकी १, गुजरात १.
गुरुवारी चार बळी
पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल ५० वर्षीय महिलेचा काेराेनामुळे मृत्यू झाला. तिला न्यूमाेनिया झाल्याने उपचार सुरू होते. जळगावात काेराेना कक्षात पाॅझिटिव्ह रुग्णाचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला.
औरंगाबादमध्ये ३९ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिलेस कोरोना संसर्ग
औरंगाबादेत काेराेनाचे २ पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात आरेफ काॅलनीतील ३९ वर्षीय तरुण व सिडकाे एन-४ मधील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. महिलेच्या पतीवरही उपचार सुरू असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, मात्र ताे पुन्हा तपासणीसाठी पाठवला आहे. ३९ वर्षीय तरुण पुण्यातील कंपनीत नाेकरीस हाेता. रुग्ण महिलेचा पती दिल्लीसह कुलू- मनालीची सहल करून परतल्यानंतर आधी त्याची प्रकृती बिघडली. नंतर पत्नीवरही उपचार सुरू हाेते. दाेन्ही रुग्णांच्या घरापासून १०० मीटरचा परिसर सील केला असून त्या भागात जंतुनाशकाची तातडीने फवारणी झाली. यापूर्वी आैरंगाबादेत ५९ वर्षीय महिलेला काेराेनाची लागण झाली हाेती.